बातमीदार. खरं तर सामान्य माणसानं ज्याच्याकडे थोडं वचकून पहावं अशी व्यक्ती! पण "या" बातमीदारानं बाकीच्या बातमीदारांना वचक बसवलाय असं माझा पत्रकार मित्रानंच सांगितलं. बघितलं तर खरंच, काय एकेका पेपर आणि च्यानलचे कपडे काढल्येत बापूंनी. म्हणजे माझ्यासारख्या बिगर पत्रकारालाही मजा आली, मग पत्रकारांचं काय विचारता? स्लमडॉगनी ८ बक्षिसं काय पटकावली अमेरिकेत आणि बापूंनी लगेच सकाळी सकाळी चॅनेल आणि पेपरांवर तोंडसूख घेतलं. म्हणजे त्यांची अपेक्षा अशी की पेपरांनी नवीन काहीतरी दिलं पाहिजे. पण प्रश्न हा आहे की चॅनल वाल्यांनी काहीतरी शिल्लक तर ठेवलं पाहिजे ना? मग पेपरवाले काय, सगळंच शिळं छापणार ना? आपल्याला पत्रकारितेतलं काही म्हणजे काही ठाऊकी नाही हां... पण काय वाटतं माहित्ये का. हे सगळे चॅनल आणि पेपरवाल्यांनी एकत्र बैठक घ्यावी आणि तुम्ही काय दाखवावं, आम्ही काय छापावं, ते ठरवून टाकावं. म्हणजे बापूंचा प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड... नाही का?
बरं हे झालं आजच्या पोस्टचं. पण एकूण हा ब्लॉग म्हणजे चांगला टाईमपास आहे. पत्रकांच्या ऊखाळ्या-पाखाळ्या आम्ही कधी ऐकाव्या नाहीतर? हे जे कोण बापू अत्रंगे आहेत, ते अत्रंगही आहेत, असं दिसतंय. कारण, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचा दबदबा अशा थोर थोर पत्रकारांचे कपडेही ते गुमानपणे काढतात. म्हणजे थेट लोकसत्ताचे आजी सं., खासदार श्री. म.टा.चे माजी सं., सामनाचे रोखठोक सं. किंवा आय.बी.एन्.-लोकमतचे महासं., साम मराठीचे च्यानल हेड (माझा पत्रकार मित्र म्हणतो,.ते हेड-बिड नाहीयेत... मग मी त्याला म्हणालो की मी वाचलं त्यांचं नाव च्यानल हेड म्हणून, तर म्हणाला बकवास आहे. पण आपण काय ऑफिशीयल काय आहे ते लिहीणार ना?) या मोठ्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी बापू अत्रंगपणा करुन जगजाहीर करतात. म्हणून बापू खूपच थोर वाटले मला. माझा पत्रकार मित्र म्हणतो की बापू म्हणे सकाळचा पत्रकार आहे. खरंच शंकेला जागा आहे, असं वाटतं ब्लॉग वाचल्यावर. कारण सकाळ आणि साम या वाहिन्यांवर जितकं लिहीतात बापू. त्या मानानं बाकीच्यांकडे थोडं दुर्लक्षच होतं म्हणे.
तर असा हा ब्लॉग. मराठी ब्लॉग. याचे "सहयोगी ब्लॉग" पण आहेत म्हणे नेटवर. ते पाहतो आता आणि त्यावर पुढल्या पोस्टमध्ये.... लवकरच!
- ब्लॉग स्कॅनर